MAR 305 | लोकवाङ्मय | YCMOU BATY MAR 305 eBook
University: | YCMOU (यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ) |
---|---|
Course: | B.A. |
Year/Semester: | 3rd Year - No Semester |
Duration: | 12 Months |
Book Pages: | 122 |
E-Book Price: |
₹ 27
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
आपल्याला महाराष्ट्रातील लोकसाहित्याच्या अभ्यासातून महाराष्ट्र संस्कृतीचा मागोवा घेण्याचे एक साधन म्हणून लोकसाहित्याचा अभ्यास करावयाचा आहे. निखळ कविता, निखळ नाटक, निखळ कथा असा केवळ वाङ्मयीन सौंदर्य गुण वैशिष्ट्यांपुरता हा अभ्यास मर्यादित असणार नाही. ह्या अभ्यासाच्या निमित्ताने तुम्हाला आपल्या आजूबाजुच्या प्रदेशातील स्थानिक लोकपरंपरांचा, लोकवाङ्मयाच्या संचिताचा अभ्यास करता यावा, स्थानिक बोलीतील लोकगीते, लोककथा, म्हणी, वाक्प्रयोग यांचा संग्रह करता यावा आणि त्यातून स्थानिक लोक संस्कृतीविषयीचे आपले आकलन अधिक स्पष्ट करून घेता यावे यासाठी या अभ्यासाचा उपयोग होईल.
या अभ्यासक्रमाची एकूण तीन पुस्तकांत विभागणी करण्यात आली आहे. पहिल्या पुस्तकात तुम्हाला लोकसाहित्य म्हणजे काय, ललित साहित्यापेक्षा ते कोणत्या अर्थाने वेगळे आहे, त्याचे स्वरूप आणि व्याप्ती, त्याचे वर्गीकरण, त्याचे सांस्कृतिक आणि वाङ्मयीन मूल्य यांचा परिचय करून देण्यात आला आहे. लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, लोककला या लोकवाङ्मयीन आविष्कारांबरोबरच लोकभाषेतील कुटे, प्रहेलिका, म्हणी आणि वाक्प्रयोगांचाही परिचय या पुस्तकात करून दिला आहे. ही तोंडओळख झाली म्हणजे तुम्हाला तुमच्या परिसरातील लोकसाहित्य ऑणि लोकभाषेतील नमुन्यांचे संकलन आणि संपादन करण्याची दिशा स्पष्ट होईल.
दुसऱ्या पुस्तकात परंपरेने चालत आलेले लोकसाहित्य आणि आधुनिक जीवनातील वास्तव आणि आधुनिक जीवनदृष्टी घेऊन लिहिले गेलेले ललित वाङ्मय यांच्या परस्परसंबंधाचा अभ्यास कसा करता येईल याची विस्तृत चर्चा करण्यात आली आहे. असा अभ्यास करण्यासाठी अध्ययनाची काही प्रतिमाने (Models) देऊन पुढे प्रत्यक्ष नमुना उदाहरणे घेऊन लोकसाहित्य व ललित साहित्य यांतील प्रभावांचा, रचना बंधाचा, जीवनदृष्टीचा, मिथकांचा आणि भाषेचा-शैलीचा संस्कार कसा अभ्यासायचा याची चर्चा केली आहे. त्यामुळे तुम्हाला मराठी साहित्याचा आणि मराठी लोकसंस्कृतीचा परस्परानुबंध स्पष्ट करवून घ्यायला मदत होईल.
तिसऱ्या पुस्तकात लोकसाहित्याच्या विविध अभ्यासपद्धर्तीची चर्चा केली आहे. लोकसाहित्याचे संकलन कसे करावे, संकलित लोकसाहित्यांचे संपादन कसे करावे, यासाठी 'क्षेत्रीय सर्वेक्षणा' चे स्वतंत्र प्रकरण या पुस्तकात योजलेले आहे. त्यानुसार तुम्ही आपल्या परिसरातील लोकसाहित्याचे सर्वेक्षण करून संकलन व संपादन करून पाहा.
लोकसाहित्यात पौराणिक वाङ्मय आणि स्थानिक लोकेतिहातील अनेक मिथकांचा समावेश झालेला असतो. ही मिथके उलगडली तरी स्थानिक जीवनरीत, रूढी, परंपरा, लोकसमजुती आणि जीवनविषयक तत्त्वज्ञानाचा वेध घेता येईल. रामाची किंवा सीतेची मिथ ही त्या त्या समाजगटातील लोकांच्या अनुभव घेण्याच्या पद्धतीनुसार बदलत जाते. अशा काही मिथकांचा तौलनिक अभ्यासही तुम्हाला करता येईल. लोकसाहित्यातून त्या त्या भाषेतील समाजगटांचा लोकेतिहास संग्रहित झालेला असतो.
अभ्यासक्रम
पुस्तक १ : लोकसाहित्य
घटक १ : लोकसाहित्याचे स्वरूप आणि वर्गीकरण
घटक २ : लोकगीते
घटक ३ : लोककथा
घटक ४ : लोकनाट्य
घटक ५ : लोककला
घटक ६ : कुटे, प्रहेलिका, म्हणी व वाक्प्रयोग
पुस्तक २ : लोकसाहित्य व आधुनिक साहित्य
घटक १ : परंपरा आणि आधुनिकता
घटक २ : लोकगीत आणि आधुनिक कविता
घटक ३ : लोककथा आणि आधुनिक कथा
घटक ४ : लोकनाट्य आणि आधुनिक रंगभूमी
घटक ५ : लोककला आणि आधुनिक कलाविष्कार
पुस्तक ३ : लोकसाहित्य : संशोधन पद्धती
घटक १ : क्षेत्रीय सर्वेक्षण
घटक २ : मिथक विश्ललोककथा
घटक ३ : ऐतिहासिक, तौलनिक आणि स्पष्टीकरणवारी अभ्यासपद्धती
घटक ४ : समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय व रचनानुसारी अभ्यासपद्धती
घटक ५ : लोकसाहित्याचे अभ्यासक
लोकसाहित्याच्या अभ्यासक्रमासाठी योजलेल्या तीन पुस्तकांपैकी हे पहिले पुस्तक लोकसाहित्याची समग्र ओळख करून देणारे आहे. पहिल्याच घटकात लोकसाहित्याची सर्वसमावेशक व्याख्या करून लोकसाहित्याची व्याप्ती स्पष्ट करून देण्यात आली आहे. ललित साहित्य आणि लोकसाहित्य यांत कोणत्या बाबतीत सारखेपणा आहे आणि कोणत्या कारणांनी ते एकमेकांपासून वेगळे आहे याची चर्चा करून लोकसाहित्याच्या अभ्यासाची गरज आणि दिशा पहिल्या घटकात समाविष्ट केली आहे.
लोकसाहित्यातील ठळक प्रकारांनुसार अनुक्रमे लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, लोककला असे स्वतंत्र घटक करून त्या त्या प्रकारांतील उपप्रकारांची चर्चा त्या त्या घटकात केलेली आहे. लोकगीत म्हटले की पुरुषांनी गायलेली, केवळ स्त्रियांनी गायलेली, केवळ विधी-उत्सवात म्हणावयाची, खेळ-नृत्यात गावयाची अशी वर्गवारी करून त्या त्या लोकगीत प्रकारांचा आशय आणि रचना वैशिष्ट्यांची चर्चा उदाहरणांसह केलेली आहे. त्याच पद्धतीने लोककथांतील दैवतकथा, परिकथा, दंतकथा, रूपकथा या प्रकारांची वैशिष्ट्ये, त्यातील सामाजिक-सांस्कृतिक आशय आणि त्यांचे वाङ्मयीन मूल्य यांची सोदाहरण चर्चा केलेली आहे. लोकनाट्य हा समूहाने सादर करावयाचा कला प्रकार आहे.
शेवटच्या घटकात लोकभाषेतील कुटे, प्रहेलिका, म्हणी, वाक्प्रयोग यांतून त्या त्या भाषेतील सामाजिक संस्थांचे, व्यक्ती आणि कुटुंबातील घटकांचे परस्परसंबंध, रूढी-परंपरा लोकसमजुती आणि लोकविश्वास यांचे दर्शन कसे घडते यांचा मागोवा घेण्यात आला आहे. या सर्व अभ्यासाचे स्वरूप लोकसाहित्य आणि लोकभाषेचा स्थूलमानाने परिचय करवून घेण्यापुरते मर्यादित आहे. आपल्या परिसरातील लोकसाहित्य व लोकभाषेतील नमुना उदाहरणे संकलित करून या अभ्यास घटकांशी ती जोडून पहिली म्हणजे हा अभ्यास परिपूर्ण होईल.
'लोकवाङ्मय' या अभ्यासक्रमातील 'लोकसाहित्य आणि आधुनिकता' हे दुसरे पुस्तक आपल्या हाती देताना आनंद वाटत आहे. आपण 'लोकसाहित्य परिचय' या पहिल्या पुस्तकात लोकसाहित्याची सैद्धांतिक माहिती करून घेतली आहे. लोकसाहित्याची संकल्पना आता तुम्हांला स्पष्ट झाली असेल, तसेच लोकसाहित्याच्या लोकगीत, लोककथा, लोकनाट्य या प्रकारांचे स्वरूपविशेषही लक्षात आले असतील. या पार्श्वभूमीवर आपण या पुस्तकात 'परंपरा व आधुनिकता' या तत्त्वांच्या आधारे लोकसाहित्याचा अभ्यास आहे.
लोकसाहित्य हे स्वतंत्र अभ्यासक्षेत्र असून एक प्रकारे ते 'लोकसंस्कृती विज्ञान' आहे. लोकसाहित्य परंपरागत असूनही ते चैतन्यशील असते, गतिमान असते. कालिक परिवर्तनाचे पडसाद लोकसंस्कृतीत आणि लोकसाहित्यातही उमटतात. लोकजीवनाशी लोकसाहित्याचा अनोन्यसंबंध असतो. लोकजीवनाच्या गतिमानतेचे अनुसरण लोकसाहित्यही करत असते, त्यामुळेच ते आदिमकाळापासून टिकून आहे. समकालीन जीवनव्यवहाराशी लोकसाहित्याचे संवादपूर्ण नाते असते. मानवी संस्कृतीचे सातत्यच जणू लोकसाहित्य प्रकट करीत असते. म्हणूनच लोकसाहित्य हे परंपरेचा भाग आहे, असे मानले जाते.
आधुनिकीकरणाच्या काळात आपण आपल्या अस्मितेचा शोधही घेत असतो. आपल्या संस्कृतीची दशा व दिशा निश्चित करताना आपल्या मुळांचा शोध घेणे आवश्यक ठरते. शाश्वत जीवनमूल्यांच्या आधारावरब आपले लोकसांस्कृतिक जीवन स्थिरावलेले असते. 'विज्ञान, तंत्रज्ञान, संगणकविनियोग, संगणक साक्षरता, जागतिकीकरण, खुले धोरण, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दहशतवाद' अशा विविध क्षेत्रांतील घटना-घडामोडींनी आजचा वर्तमान संदर्भ गजबजून गेला आहे. अशा संक्रमणाच्या किंबहुना स्मृतिभ्रंशाच्या कालखंडात आपल्या स्वत्वाची, अस्मितेची मुळे आपल्याला शोधावी लागतील. हा आपला लोकसंस्कृतीचा व लोककलाविष्कारांचा शोध ठरणार आहे.
या अभ्यासामधून आधुनिकतेतील लोकतत्त्वीय जाणिवा तुमच्या लक्षात येतील. येथे फक्त दिशादर्शक सूत्रे पुरविली आहेत शिवाय ती सूत्रे अंतिम नाहीत हेही लक्षात घेतले पाहिजे. 'लोकगीत व आधुनिक मराठी कविता', 'लोककथा व आधुनिक कथा', 'लोकनाट्य आणि आधुनिक रंगभूमी' व 'लोककला व आधुनिक कला' अशा त-हेची घटक मांडणी या पुस्तकात आहे. लोकसाहित्याचा अभ्यास व आधुनिक साहित्याचा अभ्यास एकत्रितपणे करण्याचा हा प्रयत्न म्हणूनच दिशादर्शक म्हणावा लागेल.
लोकवाङ्मयाचा अभ्यास करताना पहिल्या पुस्तकातून आपण लोकसाहित्याच्या व लोककलांच्या विविध प्रकारांचा परिचय करून घेतला तसेच दुसऱ्या पुस्तकातून आधुनिक साहित्यातील कविता, कथा, नाटक रंगभूमी यात आढळणाऱ्या लोकतत्त्वांच्या प्रभावांचा अभ्यास केला. प्रस्तुत तिसऱ्या पुस्तकातून आपण लोकसाहित्याच्या विविध अभ्यासपद्धती समजावून घेणार आहोत. लोकसाहित्य हे लिखित साहित्य नसल्यामुळे त्याचे प्रत्यक्ष क्षेत्रावर जाऊन संकलन करावे लागते. जात्यावर दळण दळताना, झोक्यावर बसून गाणी म्हटली जात असताना, एखाद्या उपासनाविधीत अथवा मंगलकार्यात म्हटली जाणारी गाणी, व्रतकथा, गोंधळगीते, जागरगीते किंवा खेळताना, फुगडी घालताना, पिंगा खेळताना म्हटली जाणारी गाणी ऐकून तिची लिखित संहिता केल्याशिवाय लोकसाहित्याची अभ्याससाधनेच जमा होत नाहीत. म्हणून लोकसाहित्याच्या अभ्यासाचा प्रारंभ संकलन-संपादनापासून होतो. त्याची माहिती पहिल्या घटकात दिली आहे.
लोकसाहित्यात रूपकात्मक, प्रतिकात्मक पद्धतीने आविष्कार होतात. निसर्गघटितांचे मानुषिकरण किंवा दैवतीकरण करण्याची सरसकट प्रवृत्ती असते. पर्जन्यतत्त्व, वायूतत्त्व यांच्या इंद्र-वरुण- हनुमानादी देवतारूपांत आविष्कार होतो. अशा दैवतकथांचे स्वरूप समजावून घेणे, या दैवतकथांचे आद्यस्रोत लक्षात घेणे आणि त्याआधारे मिथकांचा आशय उलगडणे त्या अभ्यासासाठी 'मिथकविश्लेषण पद्धती'चा वापर केला जातो. जीवन गतिमान असते, परंपरेला मागे टाकून आधुनिकता सतत येत असते. तरी आविष्काराचे हे मूलबंध, मिथकांची नवी रूपं घेऊन आविष्कृत होतात. अशावेळी ह्या मिथकांचे नव्या आधुनिक संदर्भात पुनर्वाचन करून अन्वयार्थ कसा लावावा, ह्यासंबंधीची काही उदाहरणे आपण दुसऱ्या घटकात अभ्यासणार आहोत.
तिसऱ्या घटकात लोकसाहित्याच्या ऐतिहासिक, तौलनिक, स्पष्टीकरणवादी, समाजशास्त्रीय, मानसशास्त्रीय, रचनानुसारी अशा विविध अभ्यासपद्धतींचा परिचय करून दिला आहे. लोकसाहित्याच्या अभ्यासाची व्याप्ती खूप मोठी आहे. कुणी समाजाच्या सांस्कृतिक इतिहासाचा शोध घेण्यासाठी लोकसाहित्याचा आधार घेतात, कुणी सामाजिक संस्थांची जडणघडण आणि उत्क्रांती जाणून घेण्यासाठी असा अभ्यास करतात, कुणी लोकमानसाची श्रद्धा, नीतिमूल्ये, अनुभव घेण्याची पद्धती जाणून घेण्यासाठी, समूहाचे मानस आकलण्यासाठी लोकसाहित्याचा अन्वयार्थ लावतात, कुणी एखाद्या रुढीचे, ग्रामनामाचे, स्थलमहात्म्याचे स्पष्टीकरण देण्यासाठी लोकसाहित्याचा आधार घेतात, कुणी केवळ कलात्मक स्वरूपाचे आकृतिबंध व त्यांच्या रचना तपासून लोककथांच्या आविष्कारातील साम्य स्थळांचा शोध घेतात.
चौथ्या घटकात लोकसाहित्याच्या पाश्चात्त्य, भारतीय व मराठी अभ्यासपरंपरांचा परिचय करून देण्यात आला आहे. लोकसाहित्याच्या व्यासंगपूर्ण अभ्यासाचे अनेक नमुने ह्या अभ्यासकांच्या प्रयत्नांनी पुढे आले आहेत. त्या सर्वांचा अत्यंत संक्षेपाने येथे परिचय करून दिला आहे. सर्वच अभ्यासकांची केवळ नामावली देणेही विस्तारभयास्तव येथे शक्य झालेले नाही. पण ह्या निवडक अभ्यासकांच्या स्थूल कामगिरीवरून तुम्हांला लोकसाहित्याच्या एकूण अभ्यासक्षेत्राची व्याप्ती लक्षात येईल.

- --
- --
Shweta Hajare 03-Aug-2021 04:59 pm
Anna Wargada 21-Jul-2021 10:08 am
dande govind irappa 16-Jul-2021 04:00 pm