महात्मा बसवेश्वर व संत मन्मथ स्वामी : अनुबंध | लेखक : शेषेराव लक्ष्मणराव चोपडे |
Duration: | Unlimited |
---|---|
Book Pages: | 373 |
E-Book Price: |
₹ 29
|
---|
E-Book Buy Date: |
--
|
---|---|
E-Book Expiry Date: |
--
|
Audio Buy Date: |
--
|
Audio Expiry Date: |
--
|
भारतामध्ये आजपर्यंत अनेक महामानव जन्माला आले. त्यांनी त्या-त्या परिस्थितीची मर्यादा ओळखून समाजात अमूलाग्र बदल घडविण्याचा प्रयत्न केला. असे करतांना त्यांनी वाङ्मय निर्मितीही केली. त्यामध्ये वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, महात्मा बसवेश्वर, गुरुनानक, श्री. चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत मन्मथ स्वामी, संत तुकाराम अशा अनेक महान विभूतींनी समाजसुधारणेचा ध्यास मनाशी बाळगून आपापल्या परीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. समाजसुधारणा आपले जीवितध्येय मानून त्यांनी ग्रंथरचनाही केली.
यापैकी बाराव्या शतकातील थोर समाजसुधारक, क्रांतिकारक, लोकशाहीचे अध्वर्यू महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वरांच्या कारकीर्दीचा आरंभ महाराष्ट्रातून झाला. महात्मा बसवेश्वरांनी जो समाज बघितला त्यामध्ये प्रचंड प्रमाणात विरोधाभास होता. धर्म विशिष्ट लोकांच्या स्वार्थासाठीचे साधन बनला होता. पुरोहितशाही, कर्मकांड, विसंगत व्रतवैकल्ये, मंदिर महात्म्य यामध्येच समाज चाचपडत होता. अस्पृश्यतेच्या नावाखाली लुबाडणूक केली जात होती. याला मूठमाती देण्यासाठीच महात्मा बसवेश्वरांनी शिव संस्कृतीतील काही सत्त्व स्वीकारून लिंगायत हा धर्म पर्याय म्हणून समाजासमोर ठेवला. त्याआधारे धर्माची पायाभरणी नव्या रूपाने केली. व्रत, वैकल्ये, अन्यायकारक रूढी, परंपरा नाकारल्या. नवसमाज निर्मितीसाठी, सामूहिक चिंतन घडवून आणण्यासाठी अनुभव मंटपाची कल्याण येथे स्थापना केली. या अनुभव मंटपात समस्त देशातून ७७० शरण होते. या सर्वांना अभिव्यक्तीचे समान स्वातंत्र्य होते. याच अनुभव मंटपातील चिंतनातून बाराव्या शतकात कन्नड वचन वाङ्मय आकाराला आले. या सर्व बदलाचे केंद्रबिंदू होते महात्मा बसवेश्वर. महात्मा बसवेश्वरांनी अस्पृश्यता नाकारून समतेचा पुरस्कार केला. धर्माने नाकारलेल्या स्त्रीला धर्माच्या मुख्य प्रवाहात आणले. महार, मांग, ढोर, चांभार, नावाडी, डोंबारी या जातीतील लोकांना एकत्र आणून त्यांना आत्मसन्मान मिळवून दिला. समता, बंधुता, दया, क्षमा, शांती, सामाजिक सद्भाव, उद्योगशीलता या कल्याणकारी मूल्यांचा केवळ उद्घोष न करता ती मूल्ये त्यांनी कृतीत उतरवली.
महात्मा बसवेश्वरांच्या या क्रांतिकारी विचारांचा आणि वचन वाङ्मयाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष प्रभाव दक्षिण भारतातील समग्र संत साहित्यावर जाणवतो. म्हणूनच अलीकडील अनेक अभ्यासक महात्मा बसवेश्वरांना 'दक्षिण भारतातला बुद्ध' असे संबोधतात. महात्मा बसवेश्वरांचा आणि महाराष्ट्राचा अत्यंत जवळचा अनुबंध आहे. महात्मा बसवेश्वरांचे बालपण सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे गेले. महात्मा बसवेश्वरांची कल्याणक्रांती ज्या ठिकाणी घडली ती चालुक्याची राजधानी कल्याण हे महाराष्ट्राला विशेषतः मराठवाड्या लगत असल्यामुळे इतर प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्रातील संत साहित्यावर महात्मा बसवेश्वरांचा प्रभाव अधिक आहे.
महात्मा बसवेश्वरांच्या नंतर बसवप्रणित विचारांचा महाराष्ट्रात प्रचार व प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. त्यातून पुढे मराठी वीरशैव लिंगायत संत साहित्याची परंपरा प्रवाहीत झाली. मराठी वीरशैव लिंगायत संत साहित्य प्राचीन शैव परंपरेशी किंवा संस्कृत साहित्याशी नाते सांगत असले तरी त्यावर महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा प्रभाव अधिक आहे. मराठवाडा कर्नाटकलगत असल्यामुळे महाराष्ट्रातील इतर भागाच्या तुलनेत मराठवाड्यातच वीरशैव लिंगायत संत साहित्य अधिक बहरले. मराठी वीरशैव लिंगायत संत साहित्याला सर्वांगाने समृद्ध करणारे एक महत्त्वपूर्ण संत म्हणून संत मन्मथ स्वामींकडे बघितले जाते. त्यांच्या साहित्यातील विचाराचा रोख लक्षात घेऊन काही अभ्यासक संत मन्मथ स्वामींना 'महाराष्ट्राचे महात्मा बसवेश्वर' म्हणून गौरवितात; तर काही अभ्यासक संत मन्मथ स्वामींनी मराठी वीरशैव लिंगायत संत साहित्याची भक्कम पायाभरणी केल्यामुळे त्यांना 'लिंगायतांचे ज्ञानेश्वर' म्हणतात. संस्कृत शैव साहित्य आणि महात्मा बसवेश्वरांचे वचन वाङ्मय यांच्या प्रभावातून संत मन्मथ स्वामींचे समग्र साहित्य आकाराला आले. संत मन्मथ स्वामींच्या एकंदर वाङ्मयावर पदोपदी महात्मा बसवेश्वरांच्या कार्याचा आणि वचन साहित्याचा प्रभाव जाणवतो.
महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात लिंगायत धर्माचा पाया रचला. महाराष्ट्रात सोळाव्या शतकात संत मन्मथ स्वामींनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांचा जागर घातला. महात्मा बसवेश्वरांचे विचार समाजासाठी अतिशय उद्बोधक राहिलेले आहेत. त्यांच्या विचारांचे समकालीनत्व आजही तितक्याच प्रकर्षाने जाणवतो. ही काळाची गरज लक्षात घेऊन मी माझ्या संशोधनासाठी महात्मा बसवेश्वर व संत मन्मथ स्वामीं यांच्या संपूर्ण विचारांचा शोध घेऊन त्यांच्या विचारांची पुन्हा एकदा नव्या काळाच्या प्रकाशात उजळणी करावी, या हेतूने प्रस्तुत संशोधन करायचे ठरवले. कारण महात्मा बसवेश्वर व संत मन्मथ स्वामी यांच्या साहित्यात मोठ्या प्रमाणात साम्यस्थळे आहेत.
आधुनिकीकरणाच्या रेट्यामुळे माणूस आपली नैतिक, धार्मिक व सामाजिक चौकट विसरला आहे. समाजात व्यक्तिवाद वेगाने फोफावत आहे. समाजाच्या नैतिक अधिष्ठानाचा बिंदू चंगळवादाकडे घसरला आहे. अशा संक्रमणाच्या काळात महात्मा बसवेश्वर व संत मन्मथ स्वामी यांचे विचार व कार्य दिशादर्शक ठरणारे आहे. म्हणून त्यांच्या विचारांचा जागर होणे ही या काळाची गरज आहे. ही गरज ओळखूनच संशोधनासाठी 'महात्मा बसवेश्वरांचा संत मन्मथ स्वामींच्या साहित्यावरील प्रभाव : एक अभ्यास' प्रस्तुत विषय निवडला आहे.
अनुक्रमणिका
१. महात्मा बसवेश्वर जीवन व कार्य
२. महात्मा बसवेश्वरांचे वचन साहित्य
३. संत मन्मथ स्वामी चरित्र व वाङ्मय
४. महात्मा बसवेश्वरांचा संत मन्मथ स्वामींच्या भाष्यग्रंथावरील प्रभाव
५. महात्मा बसवेश्वर जीवन व कार्य
6. निष्कर्षात्मक समारोप

- --
- --